पंढरपुरात आषाढी वारीसाठी नेमके किती वारकरी आले याबाबत मत- मतांतरे आहेत. सुमारे 30 ते 35 लाख भाविक येणार असा अंदाज पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाचा होता. यासाठी त्यांनी एआय टेक्नॉलॉजीचा वापर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंढरपूरच्या भाषणात ३० लाख वारकरी येत आहेत असा उल्लेख केला. मात्र काही तज्ञांच्या मते हा आकडा चुकीचा आणि फुगीर आहे. 65 एकर परिसर, शेगाव दुमाला, गोपाळपूर, चंद्रभागा वाळवंट, वाखरी तळ, पंढरपुरातील सर्व मठ, यासह पंढरी कडे येणारे सर्व रस्ते आणि शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. त्यामुळे आषाढी सोहळ्याच्या तीन दिवसाच्या कालावधीत पंढरीत सुमारे 30 लाख लोक आले असतील असा अनेकांचा अंदाज आहे. दैनिक सामनाने 30 लाखाहून अधिक भाविक दाखल झाल्याचे वृत्तांकन केले. लोकसत्ताने पंधरा लाख हुन अधिक भाविक आल्याचे म्हटले आहे तर दैनिक लोकमतने 32 लाख वारकरी आल्याचा अंदाज आपल्या वृत्तांतनातून व्यक्त केला आहे. पोलीस खाते असो किंवा माध्यम.. या सर्वांनी अंदाज बांधले आहेत. यंदाच्या वर्षी भरपूर सुविधा शासनाने दिल्या. स्वच्छता देखील खूप चांगली होती त्यामुळे यंदा रेकॉर्ड ब्रेक वारकरी दिसून आले ही वस्तुस्थिती आहे .यापुढे वारीचे अचूक नियोजन करण्यासाठी वारकऱ्यांची संख्या मोजणे देखील खूप गरजेचे आहे. सर्व पालख्या,सर्व दिंड्या, तसेच पंढरीकडे सर्व रस्त्यांवरून येणाऱ्या भाविकांची मोजणी केल्यास निश्चित आकडेवारी पुढे येऊ शकेल. त्यामुळे वारकऱ्यांची गणना कोण करी असा प्रश्न येस न्यूज मराठीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनासमोर उपस्थित केला आहे. त्याचे उत्तर शोधण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.











