सलग दहा वर्ष डीसीसी बँकेच्या संचालक पदावर राहिल्यामुळे रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदावरून सहकार मंत्री बाबासाहेब देशमुख यांना बडतर्फ करण्यात आले. याचे पडसाद आता निवडणूक होऊ घातलेल्या सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीवर उमटले आहेत. सलग दहा वर्ष संचालक म्हणून सहकारी बँकेत राहता येत नाही, थकबाकीदारांना निवडणूक लढविता येत नाही, तसेच कलम 88 अन्वे चौकशी सुरू असलेल्या माजी संचालक हे कात्रीत सापडले आहेत. अशा माजी संचालकांना सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीत उतरणे कठीण जाणार आहे. विशेष म्हणजे सोलापूर डीसीसी बँकेची प्रारूप मतदार यादी उद्या प्रसिद्ध होणार आहे तर 30 सप्टेंबर पर्यंत यावर हरकती नोंदवता येणार आहेत. 14 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे ऐन दिवाळीच्या कालावधीत डीसीसी बँकेच्या निवडणुकीचे फटाके फुटतील असे दिसते. या बँकेचे संचालक होण्यासाठी अनेक आमदारांनी देखील जोरदार प्रयत्न. त्यामुळे नव्या नियमाच्या आधारे अनेक मातब्बर माजी संचालकांचे डीसीसी बँकेत येण्याचे दरवाजे बंद होणार आहेत. याकडे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.










