सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विचार करायला लावणारी ही बातमी आहे. उजनी धरणातील पाणी अधिकच प्रदूषित झाल्यामुळे या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे असा अनेक डॉक्टरांचा दावा आहे. सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील आकडेवारी पाहता 2012 ते 2024 या बारा वर्षाच्या कालावधीमध्ये तब्बल एक लाख 16 हजार 270 एवढे कॅन्सरचे पेशंट नोंद झाले आहेत. सोलापूर, बार्शी, अकलूज या ठिकाणच्या कॅन्सर हॉस्पिटलचा विचार करता या हॉस्पिटलमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे पेशंट आढळून येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अक्कलकोट रोडवर सुरू झालेल्या रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दररोज किमान 50 ते 60 कॅन्सरचे पेशंट नव्याने आढळून हे येत आहेत. कॅन्सर मुळे किती रुग्ण दगावले याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे नाही. पुण्यातील सुमारे 500 एमएलडी ड्रेनेजचे पाणी प्रक्रिया न करता मुळा मुळा नदीत सोडले जाते आणि हेच पाणी पुन्हा उजनी धरणात येते. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण तळे यांनी उजनीच्या पाणी प्रदूषणाकडे आणि वाढणाऱ्या कॅन्सर रुग्णाकडे वारंवार लक्ष वेधले मात्र या गंभीर बाबीकडे शासन- प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केले. उजनी धरणातील धोकादायक असणारे मासे काढण्यासाठी शासनाने 16 कोटी रुपये मुंबईच्या BHNS ला दिले. परंतु पाण्याच्या प्रदूषणाकडे कोणीही लक्ष देत नाही हे दुर्दैव.












