पंढरपूर : आषाढी वारी 2026 च्या कालावधीत पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बचाव पथकाने केलेल्या तात्काळ कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला. 21 जुलै ते 26 जुलै 2026 या 5 दिवसात एकूण 35 नागरिकांचे नदीपात्रातून सुरक्षित बचाव करण्यात आले.
हे संपूर्ण बचाव कार्य जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी श्री. गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा नोडल अधिकारी श्री. शक्तिशागर ढोले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालील बचाव पथकाने पार पाडले.
वारीच्या गर्दीमुळे आणि उजनी-नीरा धरणातून झालेल्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. त्यामुळे नदीपात्रात उतरणाऱ्या भाविकांसाठी धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठावर 24 तास गस्त ठेवून बचाव यंत्रणा सज्ज ठेवली होती.
दरोजचा बचाव कार्याचा अहवाल
- दि. 21/07/2026 – 3 जणांचे बचाव
- दि. 22/07/2026 – 7 जणांचे बचाव
- दि. 23/07/2026 – 0
- दि. 24/07/2026 – 9 जणांचे बचाव
- दि. 25/07/2026 – 15 जणांचे बचाव
- दि. 26/07/2026- 01जणांचा बचाव
प्रशासनाची खबरदारी आणि समन्वय
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बचाव कार्यावर दररोज आढावा घेतला. नदीकाठावर पोल निहाय होमगार्ड, गोताखोर आणि एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले. धोकादायक ठिकाणी बॅरिकेडिंग, लाईफ जॅकेट आणि अनाउन्समेंटद्वारे भाविकांना सतर्क करण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिशागर ढोले यांच्या नियंत्रणाखालील पथकाने वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या जलद आणि समन्वयपूर्ण कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रशासनाने भाविकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, पाणीपातळी वाढत असल्याने नदीपात्रात जाऊ नये. लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी.











