आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाने स्थापन केलेली अंदाज समिती उद्यापासून तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर येत आहे. यामध्ये सत्तावीस आमदारांचा समावेश आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीचा खर्च योग्य पद्धतीने होतो का? याबाबत ही समिती आढावा घेऊन तपासणी करणार आहे. सर्व आमदारांच्या राहण्याची व्यवस्था हॉटेल बालाजी सरोवर मध्ये करण्यात आली आहे तर समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर हे शासकीय रेस्ट हाऊस मध्ये राहणार आहेत. आज रात्रीत समितीचे सर्व आमदार सोलापुरात दाखल होणार आहेत तत्पूर्वीच त्यांचे पीए आणि मंत्रालयातील अधिकारी सोलापुरात दाखल झाले आहेत.
- सार्वजनिक बांधकाम विभाग, उत्पादन शुल्क, जिल्हा परिषद, महसूल विभाग, या विभागातील सर्व विभाग प्रमुखांना या समितीमधील आमदारांची पीए आणि अधिकारी प्रोटोकॉलच्या नावाखाली त्रास देऊ लागले आहेत. त्यामुळे अधिकारी चांगलेच वैतागले आहेत. काही आमदारांचे पीए हे आमदाराच्या नावाखाली अधिकाऱ्यांना मनमानी रकमा मागू लागले आहेत. त्यामुळे बरेच खाते प्रमुख वैतागले आहेत.
या समितीची बैठक उद्या जिल्हा नियोजन समितीमध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी या समितीतील आमदार काही ठिकाणी जागेवर कामाची पाहणी करणार आहे. पुन्हा 22 ऑगस्ट रोजी या समितीची अधिकाऱ्यांसमवेत सोलापुरात बैठक होणार आहे.
कामाच्या चुका दाखवणे,चुकीची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शासनाकडे रिपोर्ट पाठवणे , शासनाकडून जास्त खर्च होत अशा कामावरील खर्च नियंत्रित करणे, ज्या कामासाठी निधी दिला त्या कामासाठी तो खर्च होत आहे का हे तपासणे असे ह्या समितीचे काम आहे. वास्तविक पाहता हे मंत्रालयात बसून देखील काम करता येते. परंतु कारवाईची भीती दाखवून त्यांच्याकडून मलई खाण्याचा उद्योग समितीतील काही आमदारांचे पीए त्यांच्या नावावर करू लागले आहेत. आज अनेक अधिकाऱ्यांनी ही बाब खाजगी मध्ये बोलून दाखवली.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या समितीमधील आमदार आणि त्यांच्या पी ए ना आवरण्याची गरज आहे. छत्रपती संभाजी नगर तसेच अहिल्या नगरात देखील या समितीबद्दल अधिकारी वर्गात बोंबाबोंब सुरू होती. त्यामुळे आमदाराच्या नावाखाली त्यांचे बगलबच्चे की स्वतः आमदार प्रोटोकॉल च्या नावाखाली पैसे उकळू लागले आहेत याचा तपास होणे गरजेचे आहे. समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे










