येस न्यूज नेटवर्क: रुग्णालयांमध्ये आगीच्या घटना घडल्यास जीवितहानी टाळण्यासाठी जिल्ह्यातील ५६६ शासकीय व खासगी रुग्णालयांना अग्निसुरक्षा परीक्षण (फायर ऑडिट) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी संबंधित रुग्णालयांना फायर ऑडिटचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नगरपरिषद, नगरपंचायत आणि नगरपालिका हद्दीतील शासकीय आरोग्य संस्थांसह जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचाही या मोहिमेत समावेश आहे. जिल्ह्यात ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांची संख्या २१ असून, त्यांच्यासह एकूण ५६६ रुग्णालयांना अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अलीकडे घडणाऱ्या रुग्णालयातील आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्वाची मानली जात आहे. रुग्णालयांमध्ये आग लागल्यास रुग्ण, डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढता यावे, यासाठी फायर अलार्म, अग्निशामक यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, विद्युत व्यवस्था आणि इतर अग्निसुरक्षा उपाययोजनांची तपासणी करणे आवश्यक आहे.











