सोलापूर विद्यापीठात क्रीडा दिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
18

सोलापूर, दि. 26- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मंगळवार, दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता विविध स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभ व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर चे कुलपती नियुक्त पूर्व व्यवस्थापन परिषद सदस्य श्री अमित कुलकर्णी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरु डॉ. राजनीश कामत असणार आहेत. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. गौतम कांबळे, कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात सोलापूरचे सुपुत्र पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे या एव्हरेस्टवीराचा विशेष सत्कार केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अरुण धनसिंग राठोड याचा सत्कार केला जाणार आहे. याशिवाय आंतर -विद्यापीठ स्पर्धेमध्ये कुस्तीत प्रथम क्रमांक मिळवणारा रविराज धर्मराज चव्हाण, पॉवरलिफ्टिंगमध्ये द्वितीय क्रमांक मिळविणारी कामिनी गणेश बोस्टे, थाळीफेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविणारी संतोषी प्रकाशराव देशमुख, थाळीफेक स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला पृथ्वीराज ज्ञानेश्वर गोडसे, कुस्तीमध्ये द्वितीय क्रमांक मिळालेला शुभम रघुनाथ दुधाळ, वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला ऋतुराज नामदेव गायकवाड यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक व व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, डॉ. किरण चोकाककर, डॉ. बापू मोहिते, डॉ. सचिन एलभर, डी .के. देशमुख, नंदकिशोर देशपांडे, डॉ. समर्थ मनुकर, डॉ. रवी कुनाळे, गणेश जोरवर यांचा देखील याप्रसंगी सन्मान करण्यात येणार आहे .

विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये विविध विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. याकार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले आहे .