सोलापूर : राज्यभरात राजकारणात काका आणि पुतणे यांचे वाद आपण पाहत आहोत. मात्र सोलापूर शहरात काका पुतण्यांनी मिळून दोन्ही पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मिळवली आहे हे विशेष. माजी महापौर महेश कोठे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली. त्यांचा सामना आता भाजपचे आमदार विजयकुमार यांच्याशी होणार आहे.
सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ शिंदेला सोडावा अशी जोरदार मागणी होत असताना भाजपने हा मतदारसंघ स्वतःकडे घेतला आहे. शिवाय या ठिकाणी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांना उमेदवारी दिली आहे. पाठीमागील विधानसभेला महेश कोठे या मतदारसंघात शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करून उभारले होते. काँग्रेसच्या माजी आमदार प्रणिती शिंदे यांनी तीन वेळा या मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम केला. त्या खासदार झाल्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार की काँग्रेसच्या हातातून हा मतदारसंघ निसटणार हे 23 नोव्हेंबर रोजी समजणार आहे. अद्याप महाविकास आघाडीकडून या मतदार संघातील उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. देवेंद्र कोठे यांच्या सासू माजी महापौर श्रीकांत यन्नम यांनी देखील जावई माझा आमदार व्हावा यासाठी गेल्या सहा महिन्यापासून जोरदार बिल्डिंग लावली आहे. त्यामुळे आता सोलापुरातून कोठे घराण्यातील काका महेश कोठे महाविकास आघाडी कडून तर पुतणे देवेंद्र कोठे महायुती कडून आमदार होण्यासाठी शक्ती पणाला लावत आहेत.