सोलापूर : संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीस तीन महिन्यांची साधी कैद आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांची कैद भोगावी लागणार आहे.१४ मार्च २०२० रोजी १७ वर्षे ८ महिन्यांची मुलगी संगमेश्वर महाविद्यालयात अकाउंटच्या पेपरसाठी गेली होती. पेपर संपल्यानंतर ती घरी परत न आल्याने तिच्या आई-वडिलांनी नातेवाईक व मैत्रिणींकडे चौकशी केली. तपासादरम्यान आरोपी सौरभ संजय पाताळे (वय २१, रा. उत्तर कसबा, सोलापूर) याच्याविरुद्ध संशय व्यक्त करण्यात आला.
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ आणि POCSO Act कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब, कागदपत्रे व इतर पुरावे संकलित करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपी सौरभ पाताळे यास IPC कलम ३५४ अंतर्गत ३ महिन्यांची कैद व १ हजार रुपये दंड, तसेच POCSO Act कलम १२ अंतर्गत ३ महिन्यांची कैद व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आणि न्यायालयात योग्य पुरावे सादर केल्यामुळे आरोपीला शिक्षा झाल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.









