पदवीधर मतदार संघासाठी ७४१ मतदान केंद्रावर तर शिक्षक मतदार संघासाठी ३१० मतदान केंद्रांवर २३ ऑक्टोबर रोजी होणार मतदान
पुणे, दि. २१ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ४७ उमेदवार आणि शिक्षक मतदार संघासाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघात मिळून विभागातील पाच जिल्ह्यांत १ हजार ५१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून ४ लाख ४९ हजार ९५९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे विभागातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदार संघ- मतदान केंद्रे आणि मतदार
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या ३ लाख ८८ हजार १९ असून मतदान केंद्रे ७४१ आहेत. जिल्हानिहाय मतदान केंद्रे व मतदारांची संख्या (कंसात) अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे. पुणे – १६० मतदान केंद्रे (८८ हजार २०२ मतदार), सातारा- ९३ (४७ हजार ४६३), सोलापूर – ११७ (४९ हजार ७२, सांगली- १५९ (८८ हजार ७०) आणि कोल्हापूर जिल्ह्यात २१२ मतदान केंद्रे १ लाख १४ हजार ५६२ मतदारांची संख्या आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदार संघ- मतदान केंद्रे आणि मतदार
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकुण मतदान केंद्रे ३१० असून मतदार संख्या ६१ हजार ९४० आहे. जिल्हानिहाय मतदान केंद्रे व मतदारांची संख्या (कंसात) अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे. पुणे – ७२ मतदान केंद्रे (१६ हजार ८२२ मतदार), सोलापूर – ७६ (१५ हजार ३०३), सातारा- ४४ (९ हजार ४५४), सांगली- ४८ (८ हजार ६२) आणि कोल्हापूर जिल्ह्यात ७० मतदान केंद्रे व १२ हजार २९९ मतदारांची संख्या आहे.
शिक्षक व पदवीधर अशा दोन्ही मतदार संघांसाठी एका मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई याप्रमाणे ५ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राखीव कर्मचाऱ्यांसह सुमारे ७ हजार ५०० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
दोन्ही मतदार संघाच्या मिळून सर्व १ हजार ५१ केंद्रांवर रँप, पिण्याचे पाणी, वीज व प्रकाशयोजना, स्त्री-पुरुषासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, सावली, वैद्यकीय किट, मदत कक्ष, स्वयंसेवक, दिशादर्शक फलक व रांग व्यवस्थापनाची सोय करण्यात आली आहे.
मतदार मदत केंद्र
मतदारांना यादीत नाव शोधता यावे, यासाठी https://mahaelection.gov.in/Citizen/Search या सर्च इंजिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतपेट्या, वाहतूक व सुरक्षा
प्रत्येक जिल्ह्यात साहित्य वितरण व स्वीकृतीसाठी स्वतंत्र केंद्र उभारण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, सोलापूर- शासकीय धान्य गोदाम, रामवाडी; सातारा- डीएमजी गोदाम, एमआयडीसी, सांगली- तरुण भारत स्टेडियम, कोल्हापूर- शासकीय धान्य गोदाम, रमणमाळा येथे स्ट्राँग रूम उभारण्यात आले आहे. मतदानानंतर सर्व जिल्ह्यांतील मतपेट्या पोलीस बंदोबस्तात बालेवाडी, पुणे येथील स्वीकृती केंद्र अर्थात स्ट्राँग रूमवर आणल्या जातील.
पाचही जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक, पुणे, पिंपरी-चिंचवड व सोलापूर पोलीस आयुक्तालयामार्फत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक व पुरेसा बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आचारसंहिता, तक्रार निवारण व मतदार जनजागृती
आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सर्व जिल्ह्यांत नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून एकूण ३० भरारी पथके (एफएसटी) नियुक्त करण्यात आली आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे २४ तास कार्यरत तक्रार निवारण नियंत्रण कक्ष सुरू आहे. प्रत्येक तक्रारीची नोंद वेळ व कारवाईसह ठेवली जात असून तक्रारींचे तत्काळ सनियंत्रण होत आहे.
माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी)
जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्या दूरचित्रवाणी व केबल नेटवर्कवरील राजकीय जाहिराती व पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यात येत आहे. एमसीएमसीच्या पूर्वप्रमाणपत्राशिवाय कोणतीही राजकीय जाहिरात प्रसारित करता येत नाही. जिल्हा माहिती अधिकारी या समित्यांचे नोडल अधिकारी आहेत.
मतदार जनजागृती (स्वीप)
प्रत्येक जिल्ह्यात स्वीप कक्ष व नोडल अधिकारी नियुक्त आहेत. मतदार यादी जिल्ह्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैध मतदान कसे करावे याबाबत वृत्तपत्रे व समाजमाध्यमांतून प्रसिद्धी केली जात असून मतदान प्रक्रियेवरील एआय-आधारित व्हिडिओ तयार केला जात आहे.
मतमोजणीची व्यवस्था
मतमोजणी मंगळवार दि. २७ ऑक्टोबर रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे.
शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी तीन रांगांमध्ये ४२ टेबल तर प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक व एक शिपाई. तर पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीसाठी पाच रांगांमध्ये १०० टेबल आणि प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक व एक शिपाई
सर्व पात्र पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतपत्रिका वैध ठरावी या उद्देशाने निवडणूक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून मतदान करावे. सर्व मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पुणे, शीतल तेली-उगले यांनी केले आहे.











