राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पाच जागांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून चुरशीने मतदान सुरू झाले आहे. चार वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ असून मंगळवारी याची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पदवीधर चे तीन आणि शिक्षक मतदार संघातील दोन असे पाच नवे आमदार कोण याचा फैसला 27 ऑक्टोबर रोजी म्हणजे मंगळवारी होणार आहे. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यातच अपक्ष उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावली असून बंडखोरांच्या पाठीशी काही ठिकाणी शिवसेना तर काही ठिकाणी भाजपने ताकद लावण्याचे दिसत असल्यामुळे निकाल धक्कादायक लागतील. सोलापूर जिल्ह्यातील 193 मतदान केंद्रावर मतदान सुरू झाली असून या सर्वच ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयेन यांनी आज सकाळी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
औरंगाबाद,,पुणे आणि नागपूर विभागातील तीन पदवीधर तर अमरावती आणि पुणे विभागात दोन शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पाच जागांसाठी 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 2499 मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले आहे. दहा लाख 68 हजार 72 मतदार यासाठी असून यापैकी किती मतदार मतदान करणार याचीही उत्सुकता आहे. पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख जाधव विरुद्ध भाजपच्या स्मिता जाधव यांच्यात थेट लढत होत असून खरी चुरस शिक्षक मतदार संघात आहे. या मतदारसंघात भाजपने कोल्हापूरच्या कौस्तुभ गावडे यांना तर महाविकास आघाडीने काँग्रेसच्या जयंत तासगावकर यांना उमेदवारी दिली. शिवसेनेने ऐनवेळी पलटी मारून अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला. शिवाय पंढरपूरचे पी बी रोंगे, माजी आमदार दत्तात्रय सावंत हे अपक्ष लढत आहेत. त्यामुळे पदवीधर पेक्षा शिक्षक मतदार संघातील निवडणूक चुरशीची ठरत आहे.








