महाराष्ट्रातील शिक्षक मतदार संघ आणि पदवीधर मतदार संघातील पाच जागांसाठी उद्या सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान होणार असून यासाठी 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यासाठी पदवीधर आणि शिक्षक असे दहा लाख 68 हजार मतदार आहेत. पुणे विभागात भाजपकडून कोल्हापुरातील स्मिता जाधव यांना पदवीधर मधून तर कौस्तुभ गावडे यांना शिक्षक मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी कडून पदवीधर मधून हर्षदा देशमुख जाधव आणि आमदार जयंत तासगावकर यांनी षड्डू ठोकला आहे. शिक्षक मतदार संघात ऐनवेळी शिवसेनेने सचिन सानप या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊन महायुतीमध्ये चांगलाच ट्विष्ठ निर्माण केला आहे. माजी आमदार दत्तात्रय सावंत, तसेच पंढरपूरचे पीबी रोंगे यांनी देखील शिक्षक मतदार संघात मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे पदवीधर पेक्षा शिक्षक मतदार संघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून कोण आमदार होणार याची उत्सुकता पुणे विभाग मतदार संघात लागली आहे.सोलापूर जिल्ह्यात पदवीधर मतदार संघात 11 तालुक्यात 49 हजार 732 एवढे मतदान आहे. तर 15,306 शिक्षक मतदार आहेत. पदवीधर आणि शिक्षक निवडणूक मतदानासाठी जिल्ह्यात अनुक्रमे 117 आणि 76 मतदान केंद्रे असणार आहेत. मतदानासाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयेन यांनी दिली.










