सोलापूर : येथील तेलुगू नाभिक ज्ञाती संस्थेतर्फे नाभिक समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री चिम्मटेश्वर रथोत्सव नागपंचमी रोजी सोमवार, दि.17 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती समाज अध्यक्ष अनिल कोंडूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापुरात दरवर्षी नागपंचमी रोजी भगवान श्री चिम्मटेश्वर स्वामींचा रथोत्सव मिरवणूक अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात पार पडतो. या दिवशी नाभिक समाज बांधव परंपरेनुसार सलून आणि क्षौर व्यवसायाचे काम पूर्णपणे थांबवून धार्मिक व पूजेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. साईबाबा चौक येथील चिम्मटेश्वर मंदिरात सोमवारी पहाटे महारुद्र अभिषेक तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर सकाळी नऊ वाजता कन्ना चौक येथून मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. औद्योगिक बँक, जोडबसवण्णा चौक, दत्तनगर, पोलीस हेडक्वार्टर रोड, अशोक चौक पोलीस चौकी, वालचंद कॉलेजमार्गे साईबाबा चौक येथे रात्री मिरवणुकीचा समारोप होणार आहे. या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांसह विविध कलाप्रकार सादर करण्यात येणार आहेत. या उत्सवात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कोंडूर यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेस सिद्राम शावनपल्ली, भास्कर बोद्दुल, संजय कोंडूर, राजू जंपाल, भास्कर तमनूर, उत्सव अध्यक्ष राजू रासकोडा आदी उपस्थित होते.











