पंढरपुरातील १२ आस्थापनांची तपासणी; खाद्यपदार्थांचे १८ नमुने विश्लेषणासाठी घेतले
सोलापूर : कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पंढरपूर शहरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी व प्रसाद विक्री केंद्रांसह एकूण १२ आस्थापनांची अचानक तपासणी करण्यात आली. तसेच विविध खाद्यपदार्थांचे १८ नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांतून लाखो वारकरी व भाविक पंढरपूर येथे दाखल होतात. या काळात भाविकांना भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा अस्वच्छ वातावरणात तयार केलेले अन्नपदार्थ विकले जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांची साठवणूक, परिसरातील स्वच्छता, खाद्यपदार्थ तयार करण्याची पद्धत, वापरण्यात येणारे खाद्यतेल, कृत्रिम रंग तसेच इतर घटकांच्या गुणवत्तेची पाहणी करण्यात आली.
नमुने निकृष्ट आढळल्यास कठोर कारवाई
तपासणीदरम्यान घेण्यात आलेल्या १८ नमुन्यांचे प्रयोगशाळेत विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त असल्याचे आढळल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
वारी कालावधीत सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेचे निकष काटेकोरपणे पाळावेत. भाविकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही हयगय करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी केले आहे.
दरम्यान, वारीच्या कालावधीत अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा भेसळीबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा. तसेच ऑनलाइन FDA तक्रार पोर्टलवरही तक्रार नोंदविता येणार आहे.











