18 नोव्हेंबर रोजी सोलापुरात आयोजन; विविध स्पर्धांसाठी आकर्षक पारितोषिके
सोलापूर : युवकांच्या सर्वांगीण विकासासोबतच संस्कृती व परंपरेचे जतन, युवकांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणे आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन बुधवार, दि. 18 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे सकाळी 9 वाजता हा महोत्सव होणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. यासाठी स्पर्धकांची जन्मतारीख 18 ऑगस्ट 1997 ते 17 ऑगस्ट 2011 या कालावधीतील असणे आवश्यक आहे. सहायक कर्मचाऱ्यांचे वय 18 ते 40 वर्षे असावे.
विविध कलाप्रकारांत स्पर्धांचे आयोजन
युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, पथनाट्य, काव्यलेखन आणि चित्रकला या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनृत्य स्पर्धेसाठी 7 मुख्य सदस्य व 3 सहायक सदस्य, तर लोकगीतासाठीही 7 मुख्य सदस्य व 3 सहायक सदस्य असतील. या दोन्ही स्पर्धांसाठी सादरीकरणाचा कालावधी 5 ते 8 मिनिटे असेल. पथनाट्य स्पर्धेसाठी 10 सदस्य असून सादरीकरणाचा कालावधी 1 ते 7 मिनिटे असेल. काव्यलेखनासाठी एका स्पर्धकाला 1.5 तास, तर चित्रकलेसाठी दोन स्पर्धकांना 6 तासांचा कालावधी देण्यात येणार आहे.
विजेत्यांना रोख पारितोषिके
स्पर्धांमधील विजेत्यांना पुढीलप्रमाणे रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
लोकनृत्य : प्रथम 7 हजार रुपये, द्वितीय 5 हजार रुपये, तृतीय 3 हजार रुपये.
लोकगीत : प्रथम 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार रुपये, तृतीय 2 हजार 500 रुपये.
पथनाट्य : प्रथम 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार रुपये, तृतीय 2 हजार 500 रुपये.
काव्यलेखन : प्रथम 3 हजार रुपये, द्वितीय 2 हजार रुपये, तृतीय 1 हजार 500 रुपये.
चित्रकला : प्रथम 3 हजार रुपये, द्वितीय 2 हजार रुपये, तृतीय 1 हजार 500 रुपये.
‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ हा स्पर्धांचा विषय
सर्व सांस्कृतिक स्पर्धांसाठी ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. स्पर्धकाचे वय 17 नोव्हेंबर 2026 रोजी 15 ते 29 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र आणि आधार कार्डची छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच माय भारत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी https://mybharat.gov.in/yuva_register या संकेतस्थळाचा वापर करावा.
एका युवकाला केवळ एका स्पर्धा प्रकारात सहभागी होता येईल. सादरीकरणामध्ये आक्षेपार्ह भाषा किंवा धार्मिक भावना दुखावणारा आशय नसावा. चित्रकला व काव्यलेखनातील साहित्य मौलिक असणे आवश्यक असून वाङ्मयचौर्य अथवा प्रताधिकार भंग असता कामा नये. सांस्कृतिक सादरीकरणासाठी वेशभूषा पारंपरिक, सुसंस्कृत व सादरीकरणास अनुरूप असावी.
17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज शाळा, महाविद्यालय किंवा संस्थाप्रमुखांच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह दि. 17 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे जमा करावेत. तसेच प्रवेश अर्ज jilhayuwamahotsav@gmail.com या ई-मेलवरही पाठविता येतील. मात्र, मूळ अर्ज स्पर्धेच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे.
सहभागी स्पर्धकांना नियमानुसार प्रवास भत्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मुख्य क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड यांच्याशी ७२१९१५५२५२, ९५०३५२०२५८ किंवा ८०१०३५०४२४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभाग तसेच युवक मंडळांनी आपल्या परिसरातील जास्तीत जास्त कलावंत व गुणवंत युवक-युवतींना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांनी केले आहे.







