सोलापूर : कर्णबधिर मुलांच्या शिक्षणाची पद्धत, त्यांच्या संवादाची अनोखी भाषा, आत्मविश्वासाने व्यक्त होणारे विचार आणि निरागस भावविश्व अनुभवताना एक वेगळाच शैक्षणिक जगाचा परिचय झाला. विशेष शाळेतील हा अनुभव मनाला भावला असून, कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या क्षमतांची जाणीव करून देणारा हा क्षण प्रेरणादायी असल्याचे भावनिक उद्गार पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) डॉ. अश्विनी पाटील यांनी काढले.
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अश्विनी पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या सांकेतिक भाषेतील संवादाचे बारकाईने निरीक्षण केले. विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांची जिज्ञासा, आत्मविश्वास आणि कोणतीही कमतरता जाणवू न देता व्यक्त होणारे त्यांचे निरागस भावविश्व पाहून त्या भारावून गेल्या.
“विशेष शाळेला भेट देऊन कर्णबधिर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विश्व जवळून अनुभवता आले. त्यांच्या संवादाची पद्धत, शिकण्याची जिद्द आणि निरागसता हा माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि भावनिक अनुभव आहे,” असे डॉ. अश्विनी पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. विद्यार्थ्यांनी भविष्यात आत्मविश्वासाने वाटचाल करावी, आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा आणि जीवनात मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शनही त्यांनी केले. तसेच शिक्षकदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेणुका कर्णे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
रोटरी नॉर्थच्या अध्यक्षा आसावरी सराफ यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. अश्विनी पाटील यांचे स्वागत केले. विद्यालयाचे सचिव सुनील दावडा यांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकदिनाचे औचित्य साधून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची आणि शैक्षणिक योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या सहज समजणाऱ्या सांकेतिक भाषेत देण्यात आली. विशेष शिक्षिका योगिता बोधले आणि सोमनाथ ठाकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती प्रभावीपणे मांडली.
कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, केवळ विषयाचे ज्ञान देण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सक्षमपणे उभे करणे हे विशेष शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शिक्षकदिनाच्या निमित्ताने या कार्याचा गौरव करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या क्षमतांकडे समाजाने सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास विद्यालयाचे सचिव सुनील दावडा, ॲड. दीपक आर्वे, संजय चौगुले , डॉ यशाया शिरशेट्टी ,रंगरेज, गौरी जोशी, माजी मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, योगिता बोधले, अश्विनी ढोणे, सोमनाथ ठाकर, नागनाथ बसाते, सकलन बदेखान, साहेब गौडा पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, शबाना शेख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले. शेवटी विद्यालयाचे सचिव सुनील दावडा यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिक्षकांच्या कार्याचा सन्मान आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विश्वाची समाजाला नव्याने ओळख करून देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.









