महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; विसर्जन घाट व मिरवणूक मार्गाची पाहणी
सोलापूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील गणेशोत्सव निर्विघ्न, शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी महापालिका प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात गणेशोत्सवाच्या तयारीबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीनंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्या समवेत महापालिका अधिकारी, पोलिस प्रशासन, महावितरणचे अधिकारी आणि मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध विसर्जन घाट तसेच गणेशोत्सव मिरवणूक मार्गाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त प्रीतम येवलेकर, सहाय्यक अभियंता सुनीता इभारे, सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वेदांत बॉम्बे, एन. टी. मुजावर, पी. डी. राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.





तसेच सिद्धेश्वर देवस्थानचे ट्रस्टी शिवकुमार पाटील, मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, पद्माकर नाना काळे, सुनील रसाळे यांच्यासह विविध मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळांचे ट्रस्टी व पदाधिकारी उपस्थित होते.
महापौरांच्या समवेत विसर्जन घाटांची पाहणी
बैठकीनंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्या समवेत संबंधित अधिकारी व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणपती घाट, विष्णू घाट, धर्मवीर संभाजी तलाव आणि कंबर तलाव येथील विसर्जन कुंडांची पाहणी केली.गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक व गणेश मंडळे या ठिकाणी येणार असल्याने विसर्जन कुंडांची व्यवस्था, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सुरक्षितता, पाणी, वाहतूक नियोजन तसेच नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.






मिरवणूक मार्गावरील अडथळे तातडीने दूर करण्याच्या सूचना
त्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्या समवेत गणेशोत्सव मिरवणुकीच्या प्रमुख मार्गाचीही पाहणी करण्यात आली. यावेळी मिरवणूक मार्गावर असलेले केबलचे वायर्स, झाडांच्या फांद्या, रस्त्यावरील खड्डे, ट्रिमिंग लाईन, पाण्याच्या पाइपलाईन तसेच इतर अडथळे व तांत्रिक समस्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मिरवणूक मार्गावरील सर्व अडथळे गणेशोत्सवापूर्वीच दूर करण्याचे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, धोकादायक व अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, लोंबकळणाऱ्या केबल वायर्सची योग्य व्यवस्था करणे, पाइपलाईनमुळे निर्माण झालेले अडथळे दूर करणे आदी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विभागीय स्तरावरही समन्वय बैठका
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सव मंडळे, संबंधित मध्यवर्ती महामंडळ, महावितरण आणि पोलिस प्रशासनाच्या समन्वयाने बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकांमध्ये गणेश मंडळांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
यावेळी लोकमान्य संयुक्त मध्यवर्ती महामंडळाचे बाळासाहेब गायकवाड, लष्कर मध्यवर्ती महामंडळाचे सिद्राम चोपडे, पूर्व विभाग मध्यवर्ती महामंडळाचे संजय साळुंखे, विजापूर रोड मध्यवर्ती महामंडळाचे विश्वनाथ कोळी, विडी घरकुल मध्यवर्ती महामंडळाचे वासुदेव लोखंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच नर्सिंग में जी. अशोक कलशेट्टी, गौरीशंकर जग्गापुरे, मल्लिनाथ याळगी, विजय पुकाळे, बी.एम.डी. म्हटले, गडदे, सागर पुकाळे, विश्वनाथ आमने, उमा डेंगळे, अनिल गवळी, लता फुटाणे, हेमा चिंचोळकर, नागेश मैत्री, श्रीकांत गाडगे, सचिन स्वामी आदी उपस्थित होते.
“गणेशोत्सव हा सोलापूर शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक एकतेचा उत्सव आहे. गणेश मंडळे, भाविक आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेत सर्व तयारी पूर्ण करावी. मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळांवरील समस्या प्रत्यक्ष पाहणी करून गणेशोत्सवापूर्वीच दूर करण्यात याव्यात. महापालिका, पोलिस प्रशासन, महावितरण आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयाने काम करून उत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडावा,” असे आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले.











