येस न्यूज नेटवर्क:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कार्यरत आयुष्यमान आरोग्य मंदिर उळे याना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) 90 टक्के गुणांसह प्राप्त झाले असून त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात येणाऱ्या दर्जेदार आरोग्य सेवेवर केंद्राच्या समितीकडून शिक्कामोर्तब झाले आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) आरोग्य संस्थांच्या दर्जा आणि सुविधांची पाहणी करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (National Quality Assurance Standards – NQAS) प्रदान करण्यात येते. NQAS मूल्यांकन हे आरोग्य सेवेतील गुणवत्ता,रुग्णकेंद्रित सेवा, सुरक्षितता, स्वच्छता, व्यवस्थापन आणि प्रभावी सेवा वितरण व आरोग्य विषयक जागरूकता यांचे राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च मानांकन मानले जाते. या मानांकनामुळे आरोग्य संस्थेत रुग्णकेंद्रित, सुरक्षित, संसर्गमुक्त आणि अत्यंत दर्जेदार आरोग्यसेवा देण्यास मदत होईल. तसेच आरोग्य केंद्रांमधील सेवा वितरण, रुग्ण सुरक्षा, औषध व आधुनिक उपकरण व्यवस्थापन, नोंदवही व्यवस्थापन तसेच रुग्णांच्या समाधानात सातत्याने वाढ होईल. मानांकन प्राप्त संस्थांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विशेष प्रोत्साहन निधी मिळण्यास पात्रता प्राप्त होते. या निधीचा वापर पायाभूत सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णसुविधा अधिक मजबूत करण्यासाठी केला जाईल.
उळे येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजुषा देशमुख ,आरोग्य सेविका कल्पना सावंत,आरोग्य सेवक शुभेंद्र काळे व आशा स्वयंसेविका सत्यभामा साठे,शीतल माळी, फरहाना शेख अर्धवेळ परिचर माधुरी शिंदे यांच्या टीमने अथक परिश्रम करून हे मानांकन प्राप्त केले आहे. त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर आणि जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव तसेच दक्षिण सोलापूरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घोगरे, बोरामणी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी .डॉ.संतोषकुमार यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला बाल कल्याण समितीचे सभापती अमृता वाघे यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे NQAS मानांकन प्राप्त करण्याचा मानस असून आतापर्यंत 39 आरोग्य मंदिराना NQAS मानांकन प्राप्त झाले आहे. उर्वरित संस्थांचे इन्स्पेक्शन सुरू आहे.
- कुशल जैन. मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद सोलापूर.











