सोलापूर महापालिकेच्या विविध विभागामध्ये वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त सचिन ओंबासे लवकरच झटका देणार आहेत. सामान्य प्रशासन विभागातील गोंधळ, कर्मचाऱ्यांचे प्रमोशन तसेच विविध कामांमध्ये अनियमितता या पार्श्वभूमीवर आयुक्त ओंबासे यांनी उपायुक्त सोनाली यादव यांना तीन वर्ष आणि त्यापेक्षा जास्त एकाच खात्यात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत आदेश दिले आहेत. मंगळवार पर्यंत याबाबत यादी तयार करून बदल्यांचा प्रस्ताव आयुक्तांपुढे ठेवला जाणार असल्याची माहिती उपायुक्त सोनाली यादव यांनी दिली. सोलापूर महापालिकेत 3233 कायम कर्मचारी आहेत. यापैकी 25% कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. 1383 पदे रिक्त असून यापूर्वी महापालिकेने भरती केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 150 पदे रिक्त आहेत ही पदे भरण्यासंदर्भात शासनाने मंजुरी दिली असून हा प्रस्ताव धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मनपा सभेसमोर पाठविण्यात आला आहे. आता विधान परिषदेचे आचारसंहिता सुरू झाल्यामुळे किमान हा प्रस्ताव दीड महिने रखडणार आहे. जीएडी विभागातून विविध प्रकारचे सहा शिक्के चोरीला गेल्या प्रकरणाबाबत चौकशी करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या असून त्याची चौकशी सुरू झाल्याचे सोनाली यादव यांनी सांगितले.










