सोलापूर -पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवाभावी वाटचालीच्या निमित्ताने दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जयकुमार गोरे, मंत्री ग्रामविकास व पंचायत राज तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता विकास अभियानाला’ गती देण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या सोमवारच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व श्रेणीनिहाय स्थितीचा सविस्तर आढावा घेत तयारी पूर्ण केली आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार – सावंत आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्हा परिषद शाळांचे उपलब्ध मूलभूत, शैक्षणिक, सुरक्षितता व आधुनिक सुविधांच्या आधारे ए, बी, सी आणि डी अशा श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. विशेषतः डी श्रेणीतील शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत त्यांना सी, बी आणि पुढे ए श्रेणीत आणण्यासाठी शाळानिहाय नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
शाळांमध्ये वर्गखोल्या, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, विद्युतीकरण, किचन शेड, संरक्षण भिंत, क्रीडांगण, ग्रंथालय, शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा, हँडवॉश स्टेशन, रॅम्प, संगणक सुविधा, इंटरनेट, CCTV, इंटरॅक्टिव्ह पॅनेल आदी सुविधांचा आढावा घेण्यात आला. धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
तसेच शिक्षण विभाग व बांधकाम विभागातील अभियंत्यांची संयुक्त बैठक घेऊन शाळांच्या भौतिक सुविधांबाबत प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व गटशिक्षणाधिकारी, समग्र शिक्षा अभियानातील अभियंत्यांनी तालुकानिहाय शाळांचा आढावा दिला.
“जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधा सुधारण्यासाठी प्रत्यक्ष शाळाभेट अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळेला १०० टक्के भेट देऊन तेथील सुविधा व अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा. डी श्रेणीतील शाळांना पुढील श्रेणीत नेण्यासाठी आवश्यक कामांना प्राधान्य देऊन शिक्षण व बांधकाम विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी.”
— इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष तथा सभापती, अर्थ व बांधकाम समिती, जि. प. सोलापूर
गुणवत्तावाढीसाठी आवश्यक सुविधा कमी पडू देणार नाही “शाळांची भौतिक सुविधा सक्षम करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला समान महत्त्व देणे आवश्यक आहे. गुणवत्तावाढीसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा व साधनसामग्रीमध्ये कमतरता राहू देणार नाही. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना चांगले, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”
— चेतनसिंह केदार – सावंत सभापती, आरोग्य व शिक्षण समिती, जि. प. सोलापूर
डी श्रेणीतील प्रत्येक शाळेचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश “शाळांचे श्रेणीकरण हे केवळ मूल्यांकनापुरते मर्यादित न राहता त्यातून प्रत्यक्ष सुधारणा घडली पाहिजे. डी श्रेणीतील प्रत्येक शाळेला प्राधान्य देऊन तिच्या आवश्यक सुविधांचा शाळानिहाय आढावा घ्यावा. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी १०० टक्के शाळाभेटी करून वस्तुनिष्ठ माहिती संकलित करावी. शिक्षण व बांधकाम विभागाने समन्वयाने काम करत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, सुविधायुक्त आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर भर द्यावा.”
— कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतील या अभियानाच्या माध्यमातून ‘ शाळांचे श्रेणीनिहाय वर्गीकरण, डी श्रेणीतील शाळांची सद्यस्थिती आणि त्यांना पुढील श्रेणीत नेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा मांडण्यासाठी शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली आहे.











