‘वेचक कणेकरी’ कार्यक्रमाचे सोलापुरात आयोजन
सोलापूर : ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि लोकप्रिय स्तंभलेखक शिरीष कणेकर यांच्या अविस्मरणीय लेखनाचा आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘कणेकरी शैली’चा आस्वाद सोलापूरकर रसिकांना घेता येणार आहे. प्रिसिजन फाऊंडेशनच्या ‘प्रिसिजन वाचन अभियान’ उपक्रमांतर्गत ‘वेचक कणेकरी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.२५ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे करण्यात आले आहे.
शिरीष कणेकर यांच्या नावावर चाळीसहून अधिक पुस्तके असून, मराठी आणि इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, सिनेमा व क्रिकेटवरील त्यांचे प्रेम आणि तिरकस विनोदाची त्यांची खास शैली यामुळे त्यांचे लेखन वाचकांच्या कायम स्मरणात राहिले. कोपरखळ्या, उपरोध, अतिशयोक्ती आणि मिश्कील निरीक्षणांसोबतच संवेदनशील लेखनाची ताकदही त्यांच्या लेखणीत होती. त्यामुळेच त्यांची लेखनशैली पुढे ‘कणेकरी शैली’ म्हणून प्रसिद्ध झाली.
‘वेचक कणेकरी’ या कार्यक्रमात त्यांच्या निवडक व रोचक लेखांचे अभिवाचन, त्यांच्या लेखनातील भन्नाट किस्से आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित गप्पा-टप्पा असा बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन प्रसाद फणसे यांचे असून, ज्येष्ठ अभिनेते संजय मोने, प्रसाद फणसे, उदय सबनीस आणि विजय केंकरे हे चार अनुभवी कलाकार कार्यक्रम सादर करणार आहेत. नाटक, मालिका, चित्रपट, डबिंग, लेखन, निवेदन आणि अभिवाचन अशा विविध क्षेत्रांत या चौघांनी केलेली प्रदीर्घ मुशाफिरी लक्षात घेता, त्यांचा एकत्रित कलाक्षेत्रातील अनुभव दीडशे वर्षांहून अधिक आहे.
शिरीष कणेकरांच्या लेखणीतील विनोद, उपरोध, संवेदनशीलता आणि किस्सागोईचा आनंद या चारही कलाकारांच्या अनुभवसंपन्न सादरीकरणातून रसिकांना घेता येणार आहे. सुमारे एक तास ४५ मिनिटांचा हा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ | सायं. ६.२५ वा.
स्थळ : डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर
आयोजक : प्रिसिजन फाऊंडेशन
उपक्रम : प्रिसिजन वाचन अभियान











