विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार
सोलापूर – विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानासोबतच उद्योग, व्यवसाय, व्यवस्थापन आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांतील प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान मिळावे, तसेच त्यांच्या कौशल्यविकासाला चालना मिळावी, या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञ व्यक्तींची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ (Professor of Practice – Honorary) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी निवड समितीने शिफारस केलेल्या सहा नावांना मान्यता दिली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार मानद स्वरूपात एक वर्षाच्या कालावधीसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत शिफारस करण्यात आलेल्या नावांना सर्वानुमते मान्यता देण्यात आली. यानुसार राजेंद्र मदने, पद्मश्री पोपटराव पवार, नारायण करंजकर, राहुल बुरहानपुरे, डॉ. नरेंद्र बोरलेपवार, हरिदास होटकर यांची प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव, व्यावहारिक ज्ञान आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा समन्वय साधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या नियुक्तीमुळे विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष अनुभवाधारित ज्ञान आणि व्यावसायिक क्षेत्रातील संधींची माहिती मिळण्यास मदत होणार कुलगुरू डॉ महानवर म्हणाले. या नियुक्ती बद्दल प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी तज्ञांचे अभिनंदन केले आहे.








