येस न्यूज मराठी नेटवर्क: पावसाची अनिश्चितता, खरीप पिकांवरील संकट आणि आगामी काळात निर्माण होणाऱ्या चारा टंचाईची चिंता यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन विक्रीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील विविध जनावरांच्या बाजारपेठांमध्ये जनावरांची संख्या वाढली असून बाजार फुलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पावसाअभावी किंवा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्यास पिकांबरोबरच जनावरांसाठी हिरवा व कोरडा चारा उपलब्ध होण्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत जनावरांच्या संगोपनाचा खर्च वाढण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकरी आतापासूनच अतिरिक्त पशुधन विक्री करण्याचा निर्णय घेत आहेत.
जनावरांच्या बाजारात गायी, बैल, म्हशी यांसह विविध पशुधन विक्रीसाठी आणले जात आहे. बाजारात आवक वाढल्याने शेतकऱ्यांकडून जनावरांना योग्य भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पावसाची स्थिती, चाऱ्याची उपलब्धता आणि पशुधनाचे वाढते संगोपन खर्च यामुळे आगामी काळात जनावरांच्या बाजारातील आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











