२४९ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर आयोजन
सोलापूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने २४९-सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांची, विशेषतः नवमतदार, महिला व दिव्यांग नागरिकांची शंभर टक्के नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्र. १, सदाशिव पडदुणे यांनी नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर दि. ३, ४, १० व ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहून नागरिकांकडून मतदार नोंदणी, मतदार यादीतील माहितीमध्ये दुरुस्ती तसेच नावे वगळण्यासाठी आवश्यक अर्ज स्वीकारणार आहेत.
नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना नमुना क्र. ६ मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीतील चुकीची नोंद तसेच मयत किंवा स्थलांतरित मतदाराचे नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७ मध्ये अर्ज करता येईल. तसेच नाव, वय, लिंग, नातेसंबंध, पत्ता आदी तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्र. ८ मध्ये अर्ज करता येईल.
या विशेष शिबिरांमध्ये संबंधित राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार यादीतील नोंदी तपासाव्यात व आवश्यकतेनुसार नोंदणी, दुरुस्ती अथवा नाव वगळण्याची कार्यवाही करून घ्यावी.
विशेष शिबिरांमध्ये महिला व दिव्यांग नागरिकांच्या समावेशनाला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. पात्र नागरिक मतदार यादीत नोंदणीपासून वंचित राहू नयेत, तसेच मतदार यादीतील नोंदी अद्ययावत राहाव्यात, यासाठी नागरिकांनी या विशेष शिबिरांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीत आपले नाव नोंदवावे आणि मतदार यादीतील आपली नोंद अद्ययावत असल्याची खात्री करावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्र. १ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.











