सोलापूर : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावित पुरस्कारार्थींची यादी दि. १६ ते २२ मे, २०२३ या कालावधीत प्रसिध्द करण्यात येत आहे. याबाबत आक्षेप असल्यास संचालनालयाच्या desk14.dsys-mh@gov.in या ई-मेल वर २२ मे पर्यंत विहित नमुन्यात आक्षेप/हरकती सादर कराव्यात, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
पत्रकात म्हटले आहे, क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडुंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाद्वारे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या अनुषंगाने संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील पुरस्कार (इंग्रजीकरिता – Awards) या टॅबमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावित पुरस्कारार्थींची यादी दि. १६ ते २२ मे, २०२३ या कालावधीत प्रसिध्द करण्यात येत आहे. त्यानुसार याबाबत आक्षेप असल्यास संचालनालयाच्या desk14.dsys-mh@gov.in या ई-मेल वर दि. १६ ते २२ मे, २०२३ या कालावधीत विहित नमुन्यात आक्षेप/हरकती सादर करावयाच्या आहेत. विहित नमुना https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन, डाऊनलोड करुन घ्यावा. विहित कालावधीत प्राप्त होणा-या हरकत/आक्षेप यांचा विचार करण्यात येईल.










