- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूरच्या पथकाने सोमवारी (दि. 13 ) शहर परिसरात 2 मोटरसायकलीवरुन हातभट्टी दारुच्या वाहतूकीचा गुन्हा नोंदविला असून 290 लिटर हातभट्टी दारु व 2 दुचाकी वाहने या कारवाईत जप्त करण्यात आली आहेत.
सविस्तर वृत्त असे की, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक संभाजी फडतरे यांनी त्यांच्या पथकासह एम्प्लॉयमेंट चौक हद्दीत पाळत ठेवली असता पांडूरंग दिगंबर चव्हाण (वय 32 वर्षे, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर) या इसमास त्याच्या सुझुकी एक्सेस क्र. MH 13 DA 1342 दुचाकीवरुन दोन रबरी ट्यूबमध्ये 140 लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करतांना अटक केली. त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किंमतीसह सदुसष्ट हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांनी जवान शोएब बेगमपुरे यांचेसह सोलापूर हैदराबाद रोडवर जुना बोरामणी नाक्यासमोर पाळत ठेवून एका होंडा कंपनीच्या निळया रंगाच्या एक्सेस क्र. MH 13 DW 0602 या दुचाकीवरुन तीन रबरी ट्यूबमधून 150 हातभट्टी दारुची वाहतूक करतांना मुकेश खुबा चव्हाण (वय 33 वर्षे, रा. मुळेगाव तांडा) या इसमास अटक करुन त्याच्या ताब्यातून ब्याण्णव हजार आठशे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संभाजी फडतरे, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, जवान चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे व प्रियंका कुटे यांनी पार पाडली.
- राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारुविरोधात मोहिम तीव्र करण्यात आली असून फेब्रुवारी महिन्यात 66 गुन्ह्यात 15 वाहनांसह 103 लिटर देशी दारु, 54 लिटर विदेशी दारु, 12068 लिटर हातभट्टी दारु, 476 लिटर गोवा राज्यातील दारु, 480 लिटर ताडी, 15140 लिटर गुळमिश्रित रसायन असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आपल्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.