पावसासाठी आतुरलेल्या सोलापूर सह महाराष्ट्रातील विविध भागात काल रात्री तसेच आज पहाटे पावसाने हजेरी लावली. सोन पावलांनी ज्याप्रमाणे गौराईचे घरोघरी आगमन झालं त्याचप्रमाणे उत्तरा नक्षत्राचा पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास दीड महिन्याच्या खंडानंतर पाऊस पडू लागला आहे. सोलापूर शहरात अडीच मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे मात्र सांगोला, पंढरपूर,माळशिरस , आदी ठिकाणी देखील पाऊस झाल्याचे वृत्त आहे. सांगोला तालुक्यातील घेरडी गावात मुसळधार पाऊस झाला. आणखी आठ दिवस पावसाचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे जिल्ह्यात धो धो पाऊस पडावा आणि दुष्काळ धुवून जावा अशी मनोमन प्रार्थना सर्वत्र होत आहे.










