अरुंद गल्लीबोळ, दाट लोकवस्ती आणि गर्दीच्या बाजारपेठांमध्ये आता मिळणार जलद अग्निशमन सेवा











सोलापूर : सोलापूर शहरातील अग्निशमन व आपत्कालीन सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात रॉयल एनफिल्ड बुलेट आधारित १० अत्याधुनिक अग्निशमन जलद प्रतिसाद दुचाकी (Fire Response Bikes) नव्याने समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक अग्निशमन दुचाकींचे उद्घाटन आज महापौर विनायक रामकृष्ण कोंड्याल आणि आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सोलापूर शहरातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण, दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते, गर्दीच्या बाजारपेठा तसेच वाहतुकीची कोंडी लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचणे आवश्यक आहे. मोठ्या अग्निशमन वाहनांना काही भागांमध्ये अरुंद रस्त्यांमुळे घटनास्थळी पोहोचण्यास अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत या १० विशेष अग्निशमन दुचाकींचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी ताई देवकर, कुलगुरू महानवार, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, मदने सर, भाजप शहराध्यक्ष रोहिणी ताई तडवळकर, विधी समिती सभापती विजयाची सभापती सत्यजित वाघमोडे, नगरसेवक अक्षय अंजीखाने, नगरसेवक बिजू प्रधाने, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक व्यंकटेश कोंडी, नगरसेवक युवराज सर्वदे, नगरसेवक रवी कयावले, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक बसवराज केंगणालकर, नगरसेवक सात्विक बडवे, नगरसेविका कलावती गदगे, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका सारिका चाबुकस्वार यांच्यासह परिवहन विभागाच्या प्रमुख सारिका आकुलवार आणि अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंके उपस्थित होते.
अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अग्निशमन दुचाकी
रॉयल एनफिल्ड बुलेट या दुचाकीवर आधारित असलेल्या या विशेष अग्निशमन वाहनांमध्ये २४ लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, पाण्याचा दाब निर्माण करणारा विशेष पंप, होज रील तसेच अग्निशमनासाठी आवश्यक उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपकरणांच्या मदतीने आगीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तातडीने पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करता येणार आहे.
अरुंद गल्लीबोळ आणि बाजारपेठांसाठी ठरणार उपयुक्त
शहरातील दाट लोकवस्ती, झोपडपट्टी परिसर, अरुंद गल्लीबोळ, व्यापारी संकुले, गर्दीच्या बाजारपेठा आणि वाहतुकीची कोंडी असलेल्या ठिकाणी या फायर रिस्पॉन्स बाईक्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन कर्मचारी कमी वेळेत घटनास्थळी पोहोचून प्राथमिक अग्निशमन कार्यवाही करू शकतील. तसेच मोठ्या अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीचा फैलाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.
नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात १० अत्याधुनिक फायर रिस्पॉन्स बाईक्सचा समावेश झाल्यामुळे शहराची आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना तत्पर अग्निशमन सेवा उपलब्ध करून देणे, आगीच्या घटनांमध्ये होणारी संभाव्य जीवित व वित्तहानी कमी करणे आणि शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सोलापूरकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महानगरपालिका प्रशासनाकडून अग्निशमन सेवा अधिक आधुनिक व प्रभावी करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.











