मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरपासून सोलापूर शहर आणि जिल्हा दिवाळीत अग्नितांडव पाहायला मिळाले. काल अक्कलकोट रोडवरील हॉटेल शिवनेरीच्या पार्टीमध्ये लागलेल्या आगीत सहा वाहने जळून खाक झाली. तीन दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील येडशी मध्ये लागलेल्या आगीत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू, झाला आहे.दिवाळीच्या उत्सवात फटाक्यांची आतषबाजी सुरू असतानाच महाराष्ट्राच्या विविध भागांत आगीच्या घटनांनी अक्षरशः हाहाकार उडवला. गेल्या चार दिवसांत मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, धुळे, बीड, रायगड, धाराशिव आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत आगीच्या घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असून काही ठिकाणी जीवितहानीही झाली आहे. मुंबईतील लोखंडवाला परिसरात इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला. मुंबईत चार दिवसांत अग्निशमन दलाकडे २८२ कॉल आले असून त्यापैकी २०० घटना फटाक्यांशी संबंधित होते. पुणे शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या ९४ घटना घडल्या, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ७६ घटनांची नोंद झाली. ठाण्यात आठ दिवसांत ३० आगीच्या घटना घडल्या. नागपूरमध्ये २४ तासांत ४२ कॉल आले.
नाशिकच्या कळवण येथील किराणा गोदामाला लागलेल्या आगीत सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा माल जळाला. धुळे, बीड, रायगड, भिवंडी आणि मालेगाव परिसरातही दुकाने, गोदामे, घरे आणि गॅरेजला आगी लागल्या .सोलापूर शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तब्बल २२ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. यामध्ये २० ठिकाणी गवत आणि झाडांना आग लागली, तर दोन घरांमध्ये आग लागून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. नीलम नगर, विजापूर रोड, आदित्य नगर, अवंती नगर, बाळे, हिप्परगा, चिप्पा मार्केट, मंगळवार पेठ यांसह विविध भागांत अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली. पंढरपूर येथे चौपाड परिसरातील रेणुका टॉईज या खेळण्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळाले, तसेच शेजारील दोन घरांचेही नुकसान झाले. दिवाळीचा आनंद साजरा करताना क्षणात राख करणाऱ्या या दुर्घटनांमुळे अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.










