तात्पुरती मलमपट्टी… बहुतांश बंद असलेले कारंजे…. जिकडे पहावे तिकडे पाण्याच्या बाजूला कचरा… गटारी पेक्षा देखील घाण झालेले पाणी आणि केवळ स्टंटबाजी करणारे काही पदाधिकारी आणि अधिकारी… त्यामुळेच सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावात वारंवार मासे मरत असली तरीही यावर कोणत्याही ठोस कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही हे दुर्दैव. तलावातील पाणी खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्यामुळे पुन्हा मासे मरू लागले आहेत. त्यामुळे तलावाच्या भोवताली प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या गेटला… आलम प्रभू जवळील इकोपोंड… ओपन जिम एरिया तसेच लक्ष्मी मार्केट अशा बाजूनी तलावात डोकावले तर मोठ-मोठे मासे मरून पडल्याचे दिसते. तलावातील पाणी अत्यंत खराब झाले आहे. सिद्धेश्वर मंदिर आणि बसवलेले आणि डी पी डी सी च्या निधीतून बसवलेले बहुतांश कारंजे बंद आहेत. महापालिकेने लाईट अँड साऊंड सिस्टिम च्या ठिकाणी असलेले कारंजे पाठीमागे घटना घडल्यानंतर सुरू ठेवले होते आता हे कारंजे देखील बंद आहेत. गणपती घाटाजवळ गणेश विसर्जन कुंडात गणपती विसर्जन केल्यानंतर अद्याप मुर्त्या काढल्या नाहीत त्यामुळे इथे तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुरू आहे.सोलापूर महापालिकेतील अधिकारी -पदाधिकारी, सिद्धेश्वर देवस्थानचे पदाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन ठोस उपाययोजना केल्या तरच या तलावाचे सौंदर्य टिकेल आणि मरणारे मासे वाचतील हे तितकंच खरं आहे.











