राज्यांसह सोलापूर जिल्ह्यातील अनेक खाजगी शाळांनी पट टिकवून ठेवण्यासाठी आपल्या शाळेच्या नावात विविध आमिष दाखवलेले आहे. अशा शाळांवर कठोर कारवाई करण्याचे पत्र शिक्षण उपसंचालकांनी काढले आहे.जिल्ह्यातील अनेक खाजगी शाळांनी पात्रता संलग्नतेचे निकष पूर्ण केले नसतानाही आपल्या नावात ‘ग्लोबल,’ ‘इंटरनॅशनल,’ ‘सीबीएससी,” ‘इंग्लिश मीडियम’ आणि ‘सैनिकी’ अशी नावे लावली आहेत.असे नाव लावणे बेकायदेशीर असून या नावाशी संबंधित कुठलीही परवानगी अशा शाळांनी घेतलेली नाही.
पालकांवर भुरळ घालून त्यांनी आपल्या मुलांना शाळेत घालावे यासाठी ‘ग्लोबल’ आणि ‘इंटरनॅशनल” असे इंग्रजी शब्द वापरून त्यांची दिशाभूल करत आहेत. आणि त्यांच्याकडून फी आणि डोनेशनच्या नावाखाली आर्थिक लुबाडणूक करीत आहेत.ही गोष्ट स्पष्ट नजरेस आल्याने शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आले आहे. शाळेच्या नावात चुकीची माहिती देणे हे शिक्षण हक्क कायदा तसेच राज्य शासनाच्या नियमावलीचे उल्लंघन आहे.कोणतीही शाळा शासनाची मान्यता व संबंधित मंडळाचे संलग्नता नसताना अशा शब्दांचा वापर करू शकत नाही, त्यामुळे ही सरळ सरळ बेकायदेशीर कृती ठरते. अशांवर कठोर कारवाई करावी अशा आशयाचे पत्र शिक्षण उपसंचालकांनी माध्यमिक विभागांना दिले आहेत.अशा शाळांची माहिती घेऊन त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले आहे.

