सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम व प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आज सोलापूर महानगरपालिकेत परिवहन विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ई-बस चार्जिंग स्टेशन, बुधवार पेठ येथील ई-बस डेपो, बस थांब्यांची उभारणी यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच सोलापूर शहरातील राजेंद्र चौक बस डेपो सात रस्ता बस डेपो या ठिकाणी अजून चार्जिंग स्टेशन उभे करण्यात येतील का या संदर्भातील चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक गौतम कसबे, परिवहन विभागाच्या नियंत्रण अधिकारी सारिका अक्कलवार, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, नगर अभियंता नीलकंठ मठपती आणि अग्निशामक विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे, जेबीएम कंपनीचे प्रदीप उंबरकर, ध्रुव , परिवहन व्यवस्थापक इराण्णा वन्यालोल्लू, व्कनिष्ठअभियंता यंकटेश गुडसेलू उपस्थित होते.
बैठकीत जेबीएम कंपनीमार्फत ई-बस चार्जिंग स्टेशनची उभारणी तातडीने सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कंपनीकडून पाच चार्जर उपलब्ध करून देण्यात आले असून, चार्जिंग स्टेशनचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. बुधवार पेठ ई-बस डेपोतील प्रलंबित सिव्हिल कामे सुरू करण्यासाठी लेबर मक्ता निश्चित करून येत्या ८-१० दिवसात कंपाउंड वॉल चे काम पूर्ण करण्यास आदेशित केले आणि काम सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून घेण्याबाबतही चर्चा झाली.
शहरातील ई-बस सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधांची कामे, बस थांब्यांचे नूतनीकरण आणि तिकीट प्रणालीचे आधुनिकीकरण याबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच दिवाळीच्या अगोदर बसेस शहरात सुरू करण्यात येईल.














