सोलापूर: ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० अन्वये शासनाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, सोलापूर शहरात दसऱ्यानिमित्त होणारे विविध धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका व छबिना यांसाठी ध्वनी मर्यादेबाबत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दुरुस्ती अधिसूचना जारी केली आहे. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, नवरात्रोत्सव कालावधीत देवीच्या आरास व देखावे पाहण्यासाठी १८ व १९ ऑक्टोबर २०२६ रोजी शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच, २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसऱ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका व छबिना आयोजित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित दिवशी ध्वनी मर्यादेबाबत आवश्यक दुरुस्ती करण्यात आली आहे.
शासनाच्या २२ ऑगस्ट २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापूर शहरात रात्री १० वाजेपर्यंतच संबंधित ध्वनी मर्यादेची सवलत लागू राहणार आहे. धम्म प्रवर्तन दिनानिमित्त होणाऱ्या मिरवणुका तसेच दसऱ्यानिमित्त आयोजित करण्यात येणारे सोहळे, मिरवणुका, छबिना व इतर कार्यक्रमांदरम्यान रात्री १० वाजल्यानंतर ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० चे उल्लंघन होणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.











