मुंबई : पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राऊत यांच्या जामिनाला ईडीनं विरोध केला आहे. आज संजय राऊत यांच्या वकिलांकडून कोर्टात त्यांची बाजू मांडली जाणार आहे. राऊतांच्या जामीन अर्जावर 11 ऑक्टोबरला सुनावणी झाली होता. मात्र, वेळेअभावी त्यांचा युक्तिवाद पूर्णपण होऊ शकला नव्हता. त्यामुळं सुनावणी 17 ऑक्टोबरला घेण्याचे सांगितले होते. मात्र, पुन्हा एक दिवसानं सुनावणी पुढे ढकलत 18 ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, ईडीने (ED) केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलने बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितले. 2010 साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रुपये जमा केले होते.