ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील कृत्ये करणे, पैशाची उधळपट्टी करणे अशा अवैध प्रकारामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीत तीन ऑर्केस्ट्रा बार वर छापेमारी करून 91 जणांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये साऊंड सिस्टिम,मोबाईल, वाहने असा एकूण एक कोटी 21 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी शिवारातील कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार, भोगाव येथील सुखसागर आर्केस्ट्रा बार, आणि बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील सेंट्रो ऑर्केस्ट्रा बारवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अनेक आर्केस्ट्रा बारचे धाबे दणाणले आहेत. कोंडीतील कसिनो आर्केस्ट्रा बारचा मालक प्रभाकर केशव काळे,मॅनेजर अमोल चव्हाण त्यांच्यावर गुन्हे दाखल करून या ठिकाणी 46 लाख 31 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. खेड शिवारातील सुखसागर या आर्केस्ट्रा बारचा मालक मिथुन सुरेश राठोड, व्यवस्थापक वैभव शिवलगी यांच्यावर ही गुन्हे दाखल करून या ठिकाणी 18 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळेवाडी येथील सेंट्रो ऑर्केस्ट्रा बार मध्ये देखील 18 महिला अश्लील हावभाव करून नृत्य करताना आढळल्याने ऑर्केस्ट्रा बारचा मालक युवराज अर्जुन बारंगुळे, समाधान प्रल्हाद पाटील, यांच्यावर गुन्हे दाखल करून येथून 57 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, विशाल नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले, देविदास करंडे यांच्या पथकाने केली.

