पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीचा विभागीय आयुक्त यांच्याकडून आढावा
सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया अचूक व नियमानुसार पार पडावी, तसेच मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी मतदारांमध्ये मतदान पद्धतीबाबत जनजागृती करावी. मतदार यादीतील दुबार नोंदींची पडताळणी करून संबंधित मतदाराने एकाच ठिकाणाहून मतदान करेल, याची दक्षता घ्यावी. तसेच मतदान व मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त शितल तेली-उगले बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नागेश सुरवसे, मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हाधिकारी महसूल लक्ष्मण कसेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, सदाशिव पडदुने, सुमित शिंदे, विजया पांगारकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपागर, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) आशिष लोकरे, यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती तेली पुढे म्हणाले की, मतदान प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी मतदारांना मतदान कसे करावे, याबाबत योग्य मार्गदर्शन करावे. मतदान करताना मत अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जागृती करावी. मतदार यादीमध्ये दुबार नोंदी आढळल्यास त्यांची अचूक पडताळणी करून नियमानुसार कार्यवाही करावी. संबंधित मतदाराने एकाच ठिकाणाहून मतदान करावे, यासाठी आवश्यक समन्वय साधावा, असे निर्देश त्यांनी दिले.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निर्धारित प्रशिक्षण पूर्ण करावे. प्रशिक्षणादरम्यान देण्यात आलेल्या सूचनांचे मतदान केंद्रांवर तसेच मतमोजणीच्या ठिकाणी काटेकोरपणे पालन करावे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमांनुसार पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन म्हणाले की, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी सोलापूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी ११७ व शिक्षक मतदारसंघासाठी ७६ अशी एकूण १९३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून ४९ हजार ७२२ पदवीधर व १५ हजार ३०३ शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दि. २३ ऑक्टोबर रोजी मतदान व २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून सर्व नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती, स्ट्राँग रूम, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी सर्व मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.










