धाब्यावर दारू पिणे पडले महागात! राजवाडा दम बिर्याणी हाऊसवर छापा; दारु वाहतूकीच्या 2 मोटरसायकली जप्त

0
54

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी शहरातील होटेल राजवाडा येथे टाकलेल्या छाप्यात धाबा चालक व 4 मद्यपींना मा. न्यायालयाने एकूण 37 हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच विभागाने दारुची वाहतूक करणा-या दोन मोटरसायकलीही जप्त केल्या.


सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन विभागाच्या दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने बुधवारी सोलापूर शहरातील न्यु पाच्छा पेठ परिसरातील होटेल राजवाडा दम बिर्याणी येथे छापा टाकला असता होटेल चालक जगदिश अंबादास काकी, वय 25 वर्षे हा ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असल्याचे आढळून आला. तसेच त्या ठिकाणी दारू पीत बसलेले मद्यपी ग्राहक योगेश रमेश काळे वय 24 वर्षे, महेश कुमार गजधाने, वय 32 वर्षे, दौलाप्पा महादेव मळेकर वय 59 वर्षे व सुनिल नरेश बाकळे वय 28 वर्षे या चार ग्राहकांना जागेवरच अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 180 मिलीच्या मॅकडॉवेल नंबर 1 व्हीस्कीच्या 4 बाटल्या, 650 मिलीच्या कार्ल्सबर्ग बियरच्या 3 बाटल्या व प्लास्टिक ग्लास असा तेराशे दहा किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्ह्यातील तपास अधिकारी यांनी एका दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र गुरुवारी न्यायालयात सादर केले असता मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती नम्रता बिरादार यांनी हॉटेल चालकाला 25 हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण व जवान शोएब बेगमपुरे यांच्या पथकाने पार पडली. एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक कृष्णा सुळे यांनी सोलापूर शहरातील गुरुनानक चौक ते गांधीनगर रोडवर सुरेश बाळू पवार, वय 30 वर्षे, रा. दोड्डी तांडा या इसमाला दोन रबरी ट्यूबमधून 120 लिटर हातभट्टी दारुची मोटरसायकल क्र MH13 BM 0652 वरुन वाहतूक करतांना पकडले.

या कारवाईदरम्यान एकूण सहासष्ट हजार दोनशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत दुय्यम निरिक्षक कृष्णा सुळे, जवान चेतन व्हनगुंटी व किरण खंदारे यांनी सहभाग घेतला. तसेच निरिक्षक पंढरपूर किरण बिरादार यांनी त्यांच्या पथकासह माढा येथे एस.टी. स्टॅंड जवळ अतुल अरुण करळे, वय 39 वर्षे, रा. साठे गल्ली, माढा या इसमास त्याच्या मोटरसायकल क्र. MH 45 J 6436 वरुन एका प्लास्टीक पोत्यामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्किच्या 180 मिलीच्या 48 बाटल्या वाहतूक करतांना अटक केली. या कारवाईत अट्ठेचाळीस हजार सहाशे साठ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरिक्षक किरण बिरादार, जवान गणेश रोडे व वाहनचालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली.
आवाहन:
जनतेला आव्हान करण्यात येते की, त्यांच्या परिसरात दारूची निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास या विभागाला त्याची माहिती द्यावी. तसेच धाब्यावर बसून दारू पिणे हे कायद्याने गुन्हा असून यापुढे धाब्यांवर बसून दारू पिणाऱ्या ग्राहकांची गय केली जाणार नाही, असे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी इशारा दिला आहे.