विधानसभा निवडणुकीसाठी होमगार्डसह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताची ड्युटी
साेलापूर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पोलीसांना बंदोबस्ताची ड्युटी असणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पोलीस अंमलदार व अधिकाऱ्यांना १५ ते २५ नोव्हेंबर २०२४ या काळात सुट्ट्या व रजा मिळणार नाहीत.
पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबर २०२४ ला मतदान होणार आहे.
मंगळवार पासून (ता. २२) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून त्यासाठीही पोलीसांचा बंदोबस्त असणार आहे.
५ ते १८ नोव्हेंबर २०२४ या काळात प्रचारसभा, कॉर्नर बैठका होतील.
२३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचा निकाल जाहीर होईल.
निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रत्येक मतदारसंघात पोलीसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.
पोलीसांच्या मदतीला होमगार्ड,
राज्य राखीव पोलीस बलाचेही कर्मचारी असणार आहेत.
राज्यातील जवळपास दीड लाख पोलीस,
४७ हजार होमगार्ड व राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्यांनाही विविध ठिकाणी बंदोबस्त दिला जाणार आहे.
संवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी पोलीसांचा ज्यादा बंदोबस्त असणार असून काही ठिकाणी नवप्रविष्ठ पोलीसांनाही बंदोबस्ताची ड्युटी दिली जाणार आहे.
त्याचे नियोजन जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी बंदोबस्ताचे नियोजन
पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आदेशानुसार १५ ते २५ नोव्हेंबर २०२४ या काळात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या सुट्ट्या, रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
अजित बोऱ्हाडे, पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर
निवडणूक कामात शिक्षकांच्या दिवाळी सुट्ट्या
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी नेमलेल्या सर्वच शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांचे तालुकानिहाय प्रशिक्षण पार पडणार आहे.
मतदानाच्या १० ते १२ दिवस अगोदर प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे.
दरम्यान, शिक्षकांना २८ ऑक्टोबर २०२४ ते १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दिवाळी सुटी असणार आहे.
पण, त्यांना येत्या शनिवार, रविवारी तालुकानिहाय प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
त्यानंतर १० नोव्हेंबर २०२४ पूर्वी पुन्हा एका प्रशिक्षणाला उपस्थित राहावे लागणार आहे.
त्यामुळे शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्ट्या इलेक्शन कामातच जाणार आहेत.