शासन आपल्या दारी उपक्रमासाठी निवडलेल्या लाभार्थ्यांची माहिती विहित प्रपत्रात सादर करावी -उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख

0
40

सोलापूर :- शासन आपल्या दारी या उपक्रमाचा जिल्हास्तरीय मुख्य शासकीय कार्यक्रम लवकरच होणार आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक विभागाला शासकीय योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची निवड करून त्याची यादी प्रशासनाला सादर करण्याबाबत निर्देशित केलेले आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागानी दिनांक 15 मे ते 30 जून पर्यंत निवडलेल्या लाभार्थ्यांची माहिती शासनाकडून देण्यात आलेल्या विहित प्रपत्रात तात्काळ सादर करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी (रोहयो) चारुशीला देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासन आपल्या दारी पूर्वतयारी आढावा बैठकीत उपजिल्हाधिकारी समिती देशमुख मार्गदर्शन करत होत्या. यावेळी तहसीलदार अंजली कुलकर्णी, कृषी उप संचालक राजकुमार मोरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, अन्य विभागाचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी श्रीमती देशमुख पुढे म्हणाल्या की, प्रत्येक विभागाने शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. तसेच दिनांक 15 मे ते 30 जून 2023 या कालावधीत विविध शासकीय योजनांचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करावी. यामध्ये लाभार्थ्यांचे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक व कोणत्या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे व अनुषंगिक विषयाची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या विहित प्रपत्रात भरावी असे त्यांनी सूचित केले.

विविध विभागाच्या जिल्हास्तरीय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त सर्व तालुकास्तरीय कार्यालयाकडून लाभार्थ्यांची माहिती घेऊन ती एकत्रित करून प्रशासनाकडे सादर करणे अपेक्षित आहे. ही माहिती दिनांक 15 ते 30 जून 2023 या कालावधीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या शासकीय योजनेच्या लाभाच्या अनुषंगाने असावी. तसेच या उपक्रमाचा कालावधी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात आलेला असून सर्वेक्षण कालावधीत प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्यात आला असेल तर त्या लाभार्थ्यांची नावेही द्यावीत, असे श्रीमती देशमुख यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सर्व जिल्हास्तरीय यंत्रणेच्या कामाचा आढावा घेतला व मार्गदर्शक सूचना दिल्या. तर तहसीलदार अंजली कुलकर्णी यांनी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्रत्येक विभागाने करावयाच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच हा कार्यक्रम लवकरच होणार असल्याने सर्व संबंधित विभागांनी लाभार्थ्यांची माहिती प्रशासनाला द्यावी असेही त्यांनी आवाहन केले.