पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या, तरी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप महायुतीच्या डॉ. स्मिता योगेश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख यांच्यातील लढतीत सोलापूर जिल्हा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मात्र, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील राजकीय चित्र पाहता महायुतीची एकजूट आणि महाविकास आघाडीतील विस्कळीतपणा हा चर्चेचा विषय ठरला आहे.
महायुतीची ताकद, स्मिता जाधवांच्या प्रचाराला बळ!
डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह पक्षातील प्रमुख नेत्यांनी ताकद लावली. जिल्ह्यातील भाजप आमदार आणि लोकप्रतिनिधींनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे, स्वतः डॉ. जाधव यांनी तीन वेळा संपूर्ण जिल्ह्यात झंझावाती दौरा करत मतदारांशी संपर्क साधला.
या आक्रमक प्रचारामुळे महायुतीची संघटनात्मक ताकद, स्थानिक नेत्यांचे नेटवर्क आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय यांचा फायदा डॉ. जाधव यांना होणार आहे. उच्चशिक्षित उमेदवार ही त्यांची ओळख आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभव हेही त्यांच्या प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे ठरले आहेत.
शरद पवार गटातच फूट; हर्षदा देशमुखांची डोकेदुखी वाढली!
दुसरीकडे, हर्षदा देशमुख यांच्यासाठी परिस्थिती तितकीशी अनुकूल दिसत नाही. माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, करमाळ्याचे नारायण पाटील आणि सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख यांनी डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा दिल्याने शरद पवार गटासमोरील राजकीय पेच वाढला आहे.
ज्या पक्षाच्या बळावर हर्षदा देशमुख मैदानात उतरल्या, त्याच पक्षातील स्थानिक नेत्यांची वेगळी भूमिका त्यांच्या प्रचाराला धक्का देणारी आहे.
निकालाची दिशा सोलापूर ठरवणार?
एका बाजूला एकसंध महायुतीचे संघटनात्मक बळ, तर दुसरीकडे शरद पवार गटातील स्थानिक पातळीवरील मतभेदांचे आव्हान, अशी सोलापूरमधील लढतीची स्थिती आहे. सध्याचे राजकीय समीकरण पाहता सोलापूर जिल्ह्यातील महायुतीची एकजूट डॉ. स्मिता जाधव यांच्यासाठी निर्णायक आघाडी देणारी ठरणार आहे, तर हर्षदा देशमुख यांच्यासाठी ही लढत अधिक कठीण बनली आहे.










