येस न्यूज मराठी नेटवर्क: सोलापूर विमानतळावरून सुरू असलेली स्टार एअरची सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद झाली आहे. कंपनीने या निर्णयाची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली असून, विमान इंधनाच्या (ATF) दरात झालेली मोठी वाढ हे सेवा बंद करण्यामागील प्रमुख कारण असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. सोलापूर-मुंबई सेवा यापूर्वीही विविध कारणांमुळे बंद झाली होती. ऑगस्टमध्ये सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर काही काळातच ती पुन्हा बंद झाल्याने सोलापूरच्या हवाई कनेक्टिव्हिटीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
२४ कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविल्याची चर्चा
विमानसेवा बंद झाल्यानंतर सोलापूर विमानतळावर स्टार एअरशी संबंधित सुमारे २४ कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या २४ कर्मचाऱ्यांच्या स्थलांतराबाबत कंपनीकडून अधिकृत घोषणा केली नाही. या निर्णयामुळे सोलापूरची विमानसेवा पुन्हा सुरू होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वेळ योग्य निवडल्यास मुंबई-तिरुपती सेवेला उत्तम प्रतिसादाची शक्यता.
दरम्यान, सोलापूरहून विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी मुंबई आणि तिरुपती या महत्त्वाच्या मार्गांवर प्रवाशांच्या सोयीचे वेळापत्रक निश्चित करण्याची मागणी होत आहे. योग्य वेळेत उड्डाणे उपलब्ध करून दिल्यास मुंबईसह तिरुपती मार्गालाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो, मात्र स्टार कंपनीकडून सोलापूर मुंबई साठी दुपारची दिलेली वेळ प्रवाशांसाठी सोयीची नसल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
सोलापूरमधून मुंबई, गोवा, हैदराबाद आणि तिरुपती या मार्गांवर विमानसेवा पूर्ववत करण्याची सोलापूरकरांची आग्रही मागणी आहे. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे अधिक लक्ष देऊन पाठपुरावा करणे गरजेचे आहे.









