सुनील तटकरेंच्या विधानाने चर्चेला वेग; सुनेत्रा पवारांचे सूचक संकेत, फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष
येस न्यूज नेटवर्क: महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या भवितव्याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची विधाने आणि भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार हयात असते तर १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले असते, असा दावा केला. या विधानामुळे एकत्रीकरणाबाबत यापूर्वीपासून चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाच्या प्रश्नावर ‘योग्य वेळी सर्व गोष्टी समोर येतील,’ असे सूचक विधान केले.
दुसरीकडे, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास भाजपला विश्वासात घेणे आवश्यक असल्याची भूमिका मांडल्याने या घडामोडींना महायुतीच्या राजकारणाची किनार मिळाली आहे.
नेतृत्वाचा पेच ठरणार निर्णायक
दोन्ही गट एकत्र आल्यास पक्षाचे नेतृत्व, संघटनात्मक रचना आणि महायुतीतील स्थान हे प्रमुख मुद्दे असतील. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वावर आणि आगामी निवडणुकांवरही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
सध्या विलीनीकरणाबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र, नेत्यांच्या विधानांमुळे एकत्रीकरणाच्या शक्यतांना पुन्हा हवा मिळाली आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही प्रवाह एकत्र येणार की स्वतंत्र राजकीय वाटचाल कायम ठेवणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.











