सोलापूर- नैसर्गिक आपत्तींना रोखण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे व संवर्धन करणे, ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि हरित मित्र लोक विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दूत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी पर्यावरण दूत पुरस्काराने विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत हे होते. यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत हरित मित्र लोक विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे यांनी केले.
विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी म्हणाले की, पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने नैसर्गिक आपत्ती सारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही समाज, शिक्षक, पोलीस व सर्वांची आहे. निसर्गाबद्दल प्रेम व ओलावा सर्वांच्या मनात असणे आवश्यक आहे. पशु, प्राणी, पक्षी, जलसंधारण यावर प्रेम करण्याबरोबरच विषमुक्त शेती व सेंद्रिय शेतीकडे सर्वांनी वळणे तितकेच गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत फुलारी यांनी पर्यावरण संतुलनातच माणूस जातीचे उत्कर्ष होणार असल्याचे स्पष्ट केले.
प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी वृक्षसंपदामधून सकारात्मक ऊर्जा मिळते, असे स्पष्ट करून पर्यावरण चळवळ रुजवणे व वाढवणे हे आजच्या काळाची गरज बनल्याचे त्यांनी सांगितले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये देखील पर्यावरणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या वतीने देखील हरितवारी, वृक्षारोपण या बाबींकडे विशेष लक्ष देण्यात येते, असे त्यांनी सांगितले. निसर्गाचा ऱ्हास होऊ नये, यामुळे सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याबद्दल भूतान या देशाचा विशेष उदाहरण देत पर्यावरणाबद्दल भूतानने केलेल्या कामगिरीची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी प्रवीण देशमुख, इंद्रजीत बागल, धीरज वाटेकर, प्रवीण तळे, डॉ. तुकाराम शिंदे, मधुकर डोईफोडे, रामेश्वर कोठावणे, मनोज देवकर यांचा पर्यावरण दूत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. वीरभद्र दंडे यांनी केले.