सोलापूर – आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने महापौर विनायक कोंड्याल यांनी आज नीलम नगर, अक्कलकोट रोड परिसरातील नवले नगर, विनायक नगर, वज्रेश्वरी नगर तसेच मुद्रा सन सिटी येथील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. मागील पावसाळ्यात या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.




पाहणीदरम्यान नाल्यांची स्वच्छता, पाण्याचा निचरा, अडथळे तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नवले नगर, विनायक नगर, वज्रेश्वरी नगर आणि मुद्रा सन सिटी परिसरात पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.




यावेळी वज्रेश्वरी नगर व मुद्रा सन सिटी परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या नाल्यांची पाहणी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तसेच प्रस्तावित नाल्यांच्या कामांचा आढावा घेऊन पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाईल यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.











