सोलापूर- गणेशोत्सवाच्या कालावधीत सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने श्री गणेशा आरोग्याचा अभियान 2026 राबविण्यात येणार आहे. या अभियानात सोलापूर जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत गणेश मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे.
मा. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवाच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय संस्थांच्या मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. दि. 14 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून नोंदणीकृत गणेश मंडळांशी समन्वय साधून नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व नोंदणीकृत गणेश मंडळांनी धर्मादाय रुग्णालयांशी तातडीने संपर्क साधून आवश्यक समन्वय साधावा, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे.
‘गणेशोत्सवाच्या सेवेसोबत समाजाच्या आरोग्याचीही सेवा करूया’ या उद्देशाने आपल्या नोंदणीकृत गणेश मंडळाच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून नोंदणीकृत गणेश मंडळे, धर्मादाय रुग्णालये आणि प्रशासन यांच्या समन्वयातून नागरिकांना आरोग्यविषयक सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत गणेश मंडळांनी या सामाजिक आरोग्य अभियानात सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना धर्मादाय उपआयुक्त कार्यालय, सोलापूर यांच्यामार्फत विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही धर्मादाय उपआयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी जाहीर केले आहे.











