शासकीय कामाची आणखी सोळा लाखाची अतिरिक्त बिले द्यावीत या मागणीसाठी उत्तर सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांना धमकवल्या प्रकरणी, तसेच निवडणुकीच्या कामात अडथळा आणल्या प्रकरणी सोलापूर शहरातील अभिषेक नगर येथे राहणाऱ्या राहुल शांतीकुमार गायकवाड याच्याविरुद्ध सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या कामाशी संबंधित बिल आणि निधीच्या मंजुरीवरून हा वाद निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.संबंधित काम, बिलाची मंजुरी आणि निधीच्या व्यवहाराबाबत चौकशीचा मुद्दाही पुढे आला आहे. आरोपी राहुल शांतीकुमार गायकवाड यांच्या पत्नीला ग्रामसेवक पदावरून काढल्याचा देखील राग धरून तहसीलदाराला धमकावल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. शासकीय कामात अडथळा, निवडणुकीच्या कामात अडथळा तसेच धमकाविणे, दिव्यांग व्यक्तींना अपशब्द वापरणे या संदर्भाची विविध कलमे वापरून राहुल गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








