रश्मी शुक्ला, ओमप्रकाश गुप्तांसह चार सदस्यांसाठी एक कोटी 32 लाख मंजूर
मुंबई : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी खर्चात काटकसर करण्याचे आवाहन केले जात असतानाच लोकायुक्त कार्यालयातील चार सदस्यांसाठी आलिशान वाहने खरेदी करण्यासाठी तब्बल १ कोटी ३२ लाख १८ हजार ७६८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात सोमवारी शासन निर्णय जारी केल्याचे वृत्त आहे.या निधीतून Toyota Innova Hycross (ZX-7S) या वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे. प्रत्येक वाहनासाठी ३३ लाख ४ हजार ६९२ रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे. चार वाहनांसाठीचा एकूण खर्च १.३२ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
कोणासाठी मंजूर झाली वाहने?
लोकायुक्त म्हणून माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे कार्यरत आहेत. माजी न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे आणि सुवर्णा केवले हे न्यायिक सदस्य आहेत. त्याशिवाय माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि माजी सनदी अधिकारी ओमप्रकाश गुप्ता यांचा लोकायुक्त कार्यालयातील सदस्य म्हणून समावेश आहे.दरम्यान, वाहनांच्या प्रशासकीय मंजुरीसंदर्भातील प्रक्रिया यापूर्वीच करण्यात आली होती. ४ सप्टेंबर रोजी लोकायुक्त कार्यालयासाठी वाहनांचा सुधारित आढावा जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता वाहन खरेदीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
दुष्काळाच्या काळात खर्चावरून चर्चा
राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पहिल्या टप्प्यात २६५ तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारी खर्चात काटकसर करण्याचे आवाहन विविध मंत्र्यांकडून करण्यात येत आहे.एकीकडे खर्च कमी करण्याच्या सूचना दिल्या जात असताना दुसरीकडे लोकायुक्त कार्यालयातील सदस्यांसाठी प्रत्येकी ३३ लाखांहून अधिक किमतीची वाहने खरेदी करण्यासाठी निधी मंजूर झाल्याने या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.










