सोलापूर – प्रिसिजन वाचन अभियानाच्या ऑगस्ट महिन्यातील कार्यक्रमासाठी यंदा एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला भेटण्याची संधी मिळणार आहे. आज रविवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.२५ वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होईल.या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी (IAS) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या लेखनप्रवासाचा आणि विचारविश्वाचा वेध घेण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे.
डॉ. कुलकर्णी हे कर्तव्यनिष्ठ प्रशासक, संवेदनशील साहित्यिक, अभ्यासू संशोधक आणि प्रभावी वक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या लेखणीने कथा, कविता, निबंध, एकांकिका, नाटक, पथनाट्य, पटकथा, भाषणसंग्रह अशा विविध साहित्यप्रकारांत आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यांनी आतापर्यंत १७ हून अधिक पुस्तके आणि शेकडो लेख प्रकाशित केले असून, संपादक म्हणूनही त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या लेखनाव्यतिरिक्त त्यांनी ३० पेक्षा जास्त शॉर्ट फिल्म्ससाठी पटकथा लेखन केले आहे.या कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुलदीप जंगम आणि युनिक फीचर्स, पुणेचे प्रकाशक व लेखक मा. आनंद अवधानी यांचीही उपस्थिती लाभणार आहे.या कार्यक्रमासाठी सर्व वाचकांनी, रसिकांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले आहे.











