येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातीलच नव्हे तर देशभरातील महामार्गांचे जाळे विणत आम्ही फक्त रस्तेच नाही तर राष्ट्रबांधणी करतो असे अभिमानाने सांगत दररोज किमान 38 किलोमीटर लांबीचे महामार्ग बनविणार्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आणखी नव्या महामार्गांची घोषणा केली आहे. सुरत चेन्नई या ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा झाली असून सुरत ते अहमदनगर च्या भूसंपादनाला सुरुवात झाली आहे. आता उत्सुकता सोलापूर करांसाठी आहे. कारण नगर ते चेन्नई पर्यंतचा हा ग्रीनफिल्ड महामार्ग बार्शी उस्मानाबाद अक्कलकोट या तालुक्यातून जाणार आहे तो नक्की कोणत्या हद्दीतून जाईल हे पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे तसेच भूसंपादनाची प्रक्रिया देखील पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. याच बरोबर काल नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आणखी नव्या दोन महामार्गांची घोषणा केली आहे. पुणे कोल्हापूर बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग पावसामध्ये ठप्प होतो त्यामुळे आता दुष्काळी पट्ट्यातून नवीन पुणे-सातारा खटाव-माण विटा खानापूर कवठेमहांकाळ या दुष्काळी पट्ट्यातून जाणारा 699 किलोमीटर लांबीचा 40 हजार कोटींचा नवीन महामार्ग बनणार असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले. तसेच अहमदनगर सिन्नर दौंड बारामती फलटण दहिवडी विटा चिकोडि हा देखील महामार्ग प्रस्तावित असल्याचे त्यांनी जाहीर केले. यामुळे नक्कीच सोलापूर सांगली कोल्हापूर या भागातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.