सोलापूर : धनत्रयोदशीच्या दिवशी ‘धन्वंतरी जयंती’ तसेच ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ साजरा होत आहे. निमा शाखा सोलापूर यांचेकडून निमा भवन येथे धन्वंतरी पूजन व विविध कार्यक्रमानी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयुर्वेद प्रॅक्टिशनर साठी सोलापुरातील आयुर्वेद चिकित्सक व निमा आयुर्वेद फोरमचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश व्यवहारे यांचे व्याख्यान व विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा घेण्यात आली.
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. याप्रसंगी साई आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव गायकवाड , डॉक्टर रविराज गायकवाड, डॉक्टर नागनाथ जिड्डीमणी डॉक्टर नितीन बलदवा, डॉक्टर अमोल माळगे, डॉक्टर अभिजीत पुजारी ,डॉक्टर प्रवीण ननवरे, डॉक्टर उत्कर्ष वैद्य, डॉक्टर रमाकांत आयाचीत , डॉक्टर अनुश्री मुंडेवाडी , डॉक्टर शितल कुलकर्णी डॉ. अश्विनी देगावकर , डॉक्टर ललिता पेठकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये निमा शाखा सोलापूरचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीमनी यांनी “राष्ट्रीय आरोग्य दिनानिमित्त ” आयुर्वेदाचे महत्त्व विशद करून निमा संघटनेकडून आयुर्वेद जागृती बद्दल राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
वैद्य सुरेश व्यवहारे( एमडी आयुर्वेद) यांनी उपस्थित डॉक्टर्सना सध्याच्या आधुनिक वैद्यक निदान आणि संशोधनाच्या विविध पद्धतींची व त्याच्या शास्त्रीय नोंदीची माहिती दिली. त्यांनी केलेल्या विविध आजारावरील उपचारांचे आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारातून बरं केलेल्या रुग्णांच्या उपचारांचे, औषधांची इत्यंभूत माहिती देऊन आयुर्वेदिक पेटंट करून घेण्याचा आग्रह केला. ते पुढे म्हणाले की परंपरागत आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि आधुनिक संशोधन पद्धती यांची योग्य सांगड घालून आयुर्वेद उपचाराचे आणि पद्धतींचे जास्तीत जास्त संशोधन करून आपण सामान्य नागरिकांना योग्य जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवू शकतो.
राष्ट्रीय आर्वेदिक दिनानिमित्त आयुर्वेद स्नातकांसाठी “पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. त्यात सोलापुरातील आयुर्वेदिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आयुर्वेदा संदर्भातील विविध पोस्टर्स चे प्रेझेंटेशन केले. या प्रोस्टर प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून डॉ. तात्यासाहेब देशमुख यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या कुमारी प्रणाली प्रकाश बिराजदार हिला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण ननवरे यांनी तर आभार डॉ. पुजारी यांनी केले. याप्रसंगी सोलापुरातील निमा संघटनेचे पदाधिकारी व निमा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.